इस्लामपूर मतदारसंघात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ

इस्लामपूर मतदारसंघात महायुतीत वेगवेगळे गट आहेत. भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक व विक्रम पाटील असे तीन गट आहे. तर शिंदेसेनेत आनंदराव पवार आणि गौरव नाईकवडी असे दोन गट आहेत. त्यातच भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांचा सवतासुभा आहे. यांच्यात एकमत आजही नाही. तरीसुद्धा अजित पवार यांनी जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी केली. जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांनी मिनी गूळ पावडर निर्मितीचा मिनी कारखाना उभा करून राजकीय एन्ट्री केली आहे. जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बांधणी सुरू आहे.

जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा डाव महायुतीतून झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे इस्लामपूरच्या लढतीत थेट माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या तुतारीला आव्हान निर्माण झाले आहे. ही खेळी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी काकांच्या विरोधात केली आहे.