विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मातब्बर असलेल्या काही घराण्यात जुन्या वादाबरोबरच नव्या वादाने डोके वर काढले असून यातून आटपाडीच्या देशमुख वाड्यावर दुहीची बीजे दिसत आहेत.माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मनोदय कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर करत असताना आटपाडीच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले.
मात्र, गेली २० वर्षे हा स्वाभिमान कुठे डांबून ठेवला गेला होता, याला उत्तर मिळत नाही. तथापि, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांनी आपण भाजपमध्येच असल्याचे सांगत अप्रत्यक्ष या निर्णयाला विरोध करत असताना, स्वाभिमानाच्या या लढाईत मी माझ्या परीने सहभागी होत असल्याचे सांगितले. वसंतदादा घराण्यात जसा थोरली पाती व धाकटी पाती असा वाद आहे तसाच वाद आता आटपाडीच्या देशमुख वाड्यावर नजीकच्या काळात अधिक जोरकसपणे पाहण्यास मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.
आटपाडी तालुक्याला गेली दोन दशके विधानसभेची संधी मिळाली नाही. मात्र, या मतदारसंघावर खानापूर तालुक्याचेच वर्चस्व राहिले आहे. कधी बाबर गटाचे तर कधी विट्याच्या पाटलांचे. यात आटपाडीच्या देशमुख गटाचा वापर केवळ मतांच्या गठ्ठ्यासाठीच झाला असे दिसते. आता बदलत्या काळात राजकीय अवकाश शोधण्याचे काम या गटाला करावे लागणार आहे. मात्र, यासाठी अपक्षाचा झेंडा किती काळ खांद्यावर घ्यावा लागणार याचे उत्तर येणारा काळच देईल.
