शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; दिपकआबा साळुंखे पाटील

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आणि रेकॉर्डब्रेक शक्तीप्रदर्शन करून महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार दिपकआबा प्रेमी शिवसैनिकांनी सांगोला शहरात गर्दी केली होती.

संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून वाहनांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल झाल्याने संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र सोमवारी दिवसभर पाहायला मिळाले. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, यंदाची विधानसभा निवडणूक सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच हातात घेतली आहे. महाविकास आघाडीकडून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे. मी हाती मशाल घेतल्यापासून दररोज माझ्याकडे नवीन लोंढे शिवसेना परिवारात दाखल होत आहेत. फक्त एका हाकेवर ८ ते १० हजार महिला आणि हजारोंच्या संख्येने माझ्यावर आणि शिवसेनेवर तसेच महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या ३० ते ३५ हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

आजवर केलेल्या प्रामाणिक कामाची हीच खरी पोहोच पावती म्हणावी लागेल. सांगोलकरांचे प्रेम आणि विश्वास पाहून खरोखर मी भारावून गेलो आहे. माझ्याकडे वारकरी संप्रदायाचा वारसा आणि सेवेचा वसा आहे. सांगोलकरांच्या प्रेमाला आणि विश्वासाला शेवटच्या श्वासापर्यंत तडा जाऊ देणार नाही.