वाळवा तालुका गुलामगिरीतून मुक्त करा : निशिकांत पाटील

वाळवा तालुका क्रांतिकारकांचा आहे. गेल्या ३५ वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जनतेचा विकास कमी पण त्यांच्यावर अन्यायच जास्त झाला. हा अन्याय व हुकुमशाही यापुढे मी व माझा स्वाभीमानी मतदार सहन करणार नाही. ही विधानसभा निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभीमानाची आहे. या निवडणुकीत परिवर्तनाच्या बाजूने ठामपणे उभे रहा व वाळवा तालुका गुलामगिरीतीतून मुक्त करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी घरोघरी भेटी दिल्या. नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडला. निशिकांत पाटील यांनी त्या पूर्ण करण्यासाठी त्या कामांचा आराखडा लोकांसमोर ठेवला. निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, इस्लामपूर मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन, त्याचा संपूर्ण आराखडा घेऊन मी गेली दहा वर्षे काम करत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे थकलेले बिल माफ करण्यात आले. मोफत वीज देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. पाणंद रस्त्यासह अंतर्गत रस्ते व मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणला.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या अकार्यक्षम आमदारांनी राज्य मंत्री मंडळात मोठी पदे भोगली. परंतु मतदार संघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षामुळे येथील एमआयडीसीला उतरती कळा लागली आहे. त्यांनी मोठ-मोठ्या कंपन्या आणून येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाहीच पण आहे त्या कंपन्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यांनी फक्त आपले व आपल्या पै-पाहुण्यांची घरे भरण्यात तप्तरता दाखवली, असा आरोप निशिकांत भोसले- पाटील यांनी यावेळी केला.