पाच वर्षात केलेल्या कामांच्या बळावर मैदानात : आमदार राजूबाबा आवळे

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील गावागावांमध्ये २५५ कोटींची कामे केली आहेत. हजारो कोटींच्या गप्पा न मारता जेवढी कामे केली, तेवढीच सांगत जनतेसमोर जात आहे.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला आहे. निधी देताना गट-तट पाहिला नाही. त्यामुळेच जनता पुन्हा एकदा मला साथ देईल,’ असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजू आवळे यांनी व्यक्त केला.

विकासकामांच्या जोरावरच पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. विकासकामे आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर प्रचारात भर दिला जाणार आहे. टीकाटिप्पणी करणे माझा स्वभाव नाही. केलेले काम जनतेसमोर मांडून भविष्यात चांगले काम करून दाखविण्याचा विश्वास प्रचारादरम्यान लोकांना देणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षांचे सर्व नेते कार्यकर्ते एकसंघपणे माझ्या पाठीशी आहेत. जनता मला पुन्हा संधी देईल अशी खात्री आहे.

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सध्या जवळपास ७० पेक्षा जास्त नवे उद्योग पुणे-बंगळूर महामार्ग परिसर, लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसर याठिकाणी सुरू झाले आहेत. भविष्यातही या परिसरात छोटे-मोठे उद्योग आणून रोजगारनिर्मिती करण्यावर भर राहील, असे आवळे यांनी सांगितले.