हातकणंगले मतदारसंघात दोन मतदानयंत्रे जोडली जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात २०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ८० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १२१ उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये आजी, माजी आमदारांचाही समावेश आहे. सर्वाधिक १७ उमेदवार चंदगड विधानसभा मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदावर आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्याने या दोन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदानकेंद्रात २ मतदानयंत्रे जोडली जाणार आहेत.

यासाठी लागणारी अतिरिक्त मतदानयंत्रे जिल्हा प्रशासनाकडे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. बहुतांशी मतदारसंघातील अनेक उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यानंतर सर्वच विधानसभा निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. एका मतदानयंत्रावर पंधरा उमेदवारांची नावे आणि नोटा असे १६ नावे असतात. चंदगड आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात १६ पेक्षा जास्त नावे असल्याने येथे दोन मतदानयंत्रे बसवावी लागणार आहेत.