अनेक वर्षे सत्तेत असणार्या शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा खडा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राला विनाशाकडे नेणार्या महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखा, असे आवाहन केले.
महाराष्ट्रातील मँचेस्टर म्हणून ओळखण्यात येणार्या इचलकरंजीमध्ये निवडणूक झाल्यानंतर तत्काळ टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. राहुल गांधी यांच्या चार पिढ्या आल्या तरी 370 कलम पुन्हा येऊ शकत नाही, असे सुनावत शहा यांनी वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या जातील, असे ठणकावून सांगितले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार डॉ. अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या सभेत शहा बोलत होते. यावेळी शहा यांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.