आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार कार्यक्रमाची काल सांगता झाली. उद्या विधानसभेचे मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. सांगोल्यात यावर्षी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
शहाजी बापू पाटील यांचे स्पर्धक असलेल्या दीपक आबांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु राज्य पातळीवरील राजकारणात सांगोल्यातील शेकापची खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह आघाडी असल्याने आघाड्यांच्या राजकारणामुळे दीपकआबांना यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी कधीच मिळालेली नाही. पण राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांच्याशी असलेल्या जवळकीचा त्यांना चांगलाच राजकीय फायदा मिळाला आणि सन 2010-11 मध्ये त्यांनी विधानपरिषदेची लॉटरी लागली. विधान परिषद सदस्य असताना दीपकआबांनी आपल्याकडे काम घेऊन येणाऱ्या व्यक्तींची पक्ष पार्टी न बघता प्रत्येकाच्या कामाला न्याय दिला. आबांची बातच न्यारी त्यांची कामाशी आहे यारी असे म्हणत त्यांच्याकडे लोकांचा कल हा वाढू लागला आणि सद्यस्थिती त्यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून येते.पण त्या गटाची नेमकी ताकद किती हे आजपर्यंत कोणालाच मोजता आली नाही. त्यांची ताकद किती हे नेहमी अंधारातच राहिले.
काही ना काही कारणास्तव दरवेळी माघार घेऊन वैतागल्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक काहीही करून लढवायचीच अशी मनाशी खूनगाठ बांधलेल्या दीपकआबांना महायुतीमधून उमेदवारी मिळणे अशक्य असल्याचे दिसून आल्याने आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला अखेरचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंच्या भगव्या सेनेला जवळ केले आणि उमेदवारी ही त्यांनी मिळवली. त्यांच्या उमेदवारीमुळे यंदा सांगोल्यामध्ये पहिल्यांदा तिरंगी लढत होत आहे.
यंदा दीपकआबांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने सांगोल्याच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून आपण आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर निवडून येऊ अशी त्यांना आशा आहे.