इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून राहुल आवाडे यांनी चाय पे चर्चा, पदयात्रा, प्रत्यक्ष गाठीभेटी, कॉर्नर सभा, जाहीर सभा, मेळावे आदींच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला होता.
वस्त्रोद्योगासह शहरातील प्रश्नांची जाण असलेला प्रतिनिधी म्हणून सर्वच स्तरातून त्यांना उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळाला. या प्रचार काळात भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकार्यांसह संपूर्ण आवाडे कुटुंबिय प्रचारात मग्न झाले होते. सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीसह ग्रामीण भागात जागोजागी पदयात्रा काढण्यात आल्या. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी इचलकरंजीसह ग्रामीण भागात प्रचार पदयात्रा काढत करण्यात आली. शहापूर येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली.
वस्त्रनगरीच्या सर्वांगिण विकासासाठी आणि महायुती सरकारच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या लाभदायी योजना अविरत राहण्यासाठी राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. शहापूर येथे कारंडे मळा परिसरात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. सावित्रीनगर, भोईनगरसह संपूर्ण परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सावंत यांनी राहुल आवाडे यांना विजयासाठीचे आवाहन केले. त्याचबरोबर तारदाळ, खोतवाडी याठिकाणीही पदयात्रा काढण्यात आल्या. शहरात कामगार चाळ, सिध्दार्थ हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, इदगाह मैदान, गांधी पुतळा, होळी कट्टा, चौंडेश्वरी मंदिर, मंगळवार पेठ, नारायण टॉकीज परिसरासह सर्वच भागात पदयात्रा काढण्यात आल्या.
