यापुढेही जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहणार; आमदार राजू आवळे

हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत तिरंगी होणार आहे. मला पुन्हा संधी देऊन दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवा. आतापर्यंत जनतेचा सेवक म्हणून काम केले, यापुढेही मी कमी पडणार नाही अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजू आवळे यांनी दिली. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते.

आवळे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना दरमहा तीन हजार, तर बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील जनतेच्या हित आणि प्रगतीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व आश्‍वासनांची शंभर टक्के पूर्तता करण्याची गॅरंटी दिली आहे. महिला-मुलींना मोफत बस प्रवास, वर्षात ५०० रुपयांत ६ गॅस सिलिंडर देण्यात येणार आहेत.

महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायद्याची निर्मिती करण्यात येईल. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव दिला जाईल. गरीब कुटुंबाला २५ लाखांचा आरोग्य विमा व सरकारी रुग्णालयांतून मोफत औषधे दिली जातील. वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ आणि पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवले जाणार आहेत.’ते पुढे म्हणाले, ‘सरकारच्या विविध विभागांतील रिक्त अडीच लाख पदे भरली जातील. एमपीएससी’च्या माध्यमातून सरकारी नोकरभरती केली जाईल. नोकरीतील कंत्राटी भरती पद्धत बंद केली जाईल.

पाच वर्षांत साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देण्यात येणार आहे. पेपरफुटीविरोधातील कायदा आणखी कडक केला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना १०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल.