आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार कार्यक्रमाची काल सांगता झाली. उद्या विधानसभेचे मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. मी राज्यात प्रचारासाठी फिरत असताना आपण सर्वांनी मजबुतीने आपला मतदारसंघ सांभाळला आहे. आपला मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे. मतदारसंघातील सामान्य जनता व कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंतराव पाटील यांनी गांधी चौक येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. दिलीपतात्या पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, यशवंत गोसावी, प्रा. शामराव पाटील, अॅड. चिमनभाऊ डांगे, शहाजी पाटील, मैनुद्दीन बागवान, सुभानअली शेख, प्रा. सुकुमार कांबळे, शाकीर तांबोळी, मनीषा रोटे, शकील सय्यद, बी. जी. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. जयंतराव पाटील म्हणाले, शहरात व मतदारसंघात जे-जे मोठे काम झाले आहे ते आपण केले आहे. या शहराचा नावलौकिक होता, तो आज अडचणीत आला आहे. अनेक समस्या आहेत. पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यासाठी आपण सत्तेत असणे आवश्यक आहे. केवळ शहरच नाही तर आपल्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू. दिलीपतात्या पाटील म्हणाले, जयंतराव पाटील यांना घेरणारे अजून महाराष्ट्रात जन्माला आले नाहीत.
शाकिर तांबोळी म्हणाले, राज्यातील जनता महायुतीच्या कारस्थानाने तावून सुलाखून निघाली आहे. त्यांनी अल्पसंख्याकांसाठी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. काही उमेदवार स्वार्थासाठी बाप बदलतात. निष्ठा काय असते हे दाखवणारा मुख्यमंत्री जयंत पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला पाहायचाय. यावेळी मुस्लिम समाजाचे नेते सुभानअली शेख, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, प्रा. अरुणादेवी पाटील, मुनीर पटवेकर, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, युवती शहराध्यक्षा दीपाली साधू यांचीही भाष झाली.