कोल्हापूरकरांनी 10 आमदार दिले, मंत्रिपदं किती मिळणार? मुश्रीफ, कोरे, आबिटकर, महाडिक रेसमध्ये…

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला जोरदार यश मिळालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने दहापैकी दहा जागा पटकावल्यानंतर मातब्बर आणि ज्येष्ठ नेत्यांना आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्याशिवाय पालकमंत्री पदासाठी देखील अनेकांनी कंबर कसली असून आपापल्या परीने फिल्डिंग लावली जात आहे.पालकमंत्री पदासाठी जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांचे नाव रेस मध्ये आहे.

कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान हसन मुश्रीफ यांनी आपल्यालाला उपमुख्यमंत्री पद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारगोटीतील सभेत आमदार प्रकाश अबिटकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करू अशा आश्वासन दिले होते.

विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी डबल हॅट्रिक तर अबिटकर यांनी हॅट्रिक केली आहे. त्यामुळे ते मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्तीचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. महायुतीच्या सुत्रानुसार जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याला पालकमंत्री पद हे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे जाईल असे संकेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत. त्यातील एक हा राजर्षी शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत. यड्रावकर आणि अबिटकर हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. आमदार राहुल आवाडे आणि आमदार अमल महाडिक या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी महाडिक यांचे नाव पुढे येऊ शकते. जनसुराज्य शक्तीचे जिल्ह्यात दोन आमदार असल्याने यापूर्वी कॅबिनेटमंत्रिपद कोरे यांनी मिळवले आहे.

त्यामुळे महायुतीकडून त्यांचा सन्मान राखला जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पदाच्या रेसमध्येही कोरे आहेत.तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर क्षीरसागर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला आहे.