इचलकरंजीत आज सुळकुड पाणी योजनेसाठी रास्ता रोको

इचलकरंजी शहराला सुळकुड नळ पाणी योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी आज गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी आमच्या हक्काचं अशा घोषणा देत स्त्री-पुरुष आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरले होते.योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा होत नाही. मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याच्या शब्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. अद्यापही बैठक झालेली नाही.

तसेच लोकप्रतिनिधींचेही या योजनेकडे दुर्लक्ष आहे.यामुळे आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या माध्यमातून चार महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सकाळपासून जमत होते. महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली.