राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याचे निश्चीत झाले असून त्यांचा शपथविथी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकच टप्प्यात पार पडेल.तसेच या शपथविधी समारंभात भाजपच्या वतीने किमान १२ मंत्री व १२ राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.प्रदेश भाजपातील सूत्रानुसार, भाजपची मंत्रिमंडळाची यादी जवळपास निश्चित झाली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस तसेच अन्य भाजपा नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या गेलेल्या मंत्र्यांच्या नावावर सहमती मंजूर करवून घेत ती दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सादर केली जाईल.
भाजपच्या मंत्र्यांमध्ये काही जुन्या मंत्र्यांसह नवीन चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. यात भाजपच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचीही मंत्री म्हणून नावे आहेत. भाजपच्या विधान परिषदेच्या काही सदस्यांना मंत्री म्हणून स्थान दिले जाणार आहे. मात्र प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे की नाही?
याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने करावा असे काही प्रदेश भाजप नेत्यांचे मत असल्याचे समजते. ही भाजपच्या मंत्रिमंडळाची यादी असली तरीही या मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी द्यावी याबद्दलचा निर्णय मात्र अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यांची खातीही वरिष्ठ पातळीवरून मंजूर झाल्यानंतरच जाहीर केली जातील.शिवसेनेचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुध्दा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यांना नगर विकास खात्याबरोबरच आणखीन एखाद्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाईल. शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषवल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहायचे नसल्यास त्यांचा दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री म्हणून समावेश करण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे.
उपमुख्यमंत्री पद यापूर्वी तीन वेळा भूषवलेल्या अजित दादा पवारांना महायुती मंत्रिमंडळात पुन्हा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. तेही महायुतीत दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावेळी त्यांना बढत मिळणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे अर्थखात्यासह आणखीन एखादे वजनदार खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात येईल असे खात्रीने राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेतेमंडंळी सांगत आहेत.राज्यातील राजकारणापासून दूर राहणाऱ्या पंकजा मुंडे आता राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या तयारीत आहेत.
तशी त्यांची मानसिकता असल्याचे भाजपात बोलले जात आहे. म्हणून त्यांच्या खांद्यावर राज्यात भाजप वाढवण्याची धुरा सोपविण्याचा वरिष्ठ भाजप नेत्यांचा विचार आहे.पंकजा या तरुण पिढीला संघर्ष करणाऱ्या नेत्या वाटत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत देश- देव-धर्म हा आरएसएसचा संदेश भाजपाला शत प्रतिशत नाऱ्यापर्यंत पोहोचवेल असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे पंकजांशी स्वतंत्र वाटाघाटी करून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असेही आदेश भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींकडून देण्यात आल्याचे समजते.