महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी नागपूरमध्ये सुरू झाली आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुमारे दोन आठवड्याचे अधिवेशन घेण्यात येते. नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन राहणार आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीकडे विरोधीपक्षनेता निवडण्यासाठी लागणारे संख्याबळ नसल्याने अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा आहे.अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कामे आटोपण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यातच अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
तत्पूर्वी मंत्री आणि आमदाराच्या शपथविधीसाठी मुंबईत एक किंवा दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येईल. यातच हिवाळी अधिवेशनाची (Winter session) तारीख जाहीर केली जाईल.साधरणतः डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 20 डिसेंबरपासून अधिवेशनला सुरुवात होईल आणि दहा दिवसांचा कालावधी राहील असे सांगण्यात येते. विधिमंडळ सचिवांकडून 9 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तयारीला गती दिली आहे. युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. शासनाने मागील अधिवेशन काळातील कामांचे पैसेच अद्याप दिले नाहीत. कोट्यवधींचे बिल थकले आहे. त्याचाही कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.