अलीकडच्या काळात वातावरणातील बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अनेक साथीचे आजार डोके वर काढत असताना पाहायला मिळत आहेत. हातकणंगले तालुक्यातील चावरे येथे काविळ साथ आल्याने नूतन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी चावरे येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या.यासाठी लागेल ती मदत करु, अशी ग्वाहीही माने यांनी यावेळी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, जिल्हा आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. सतीश सुर्यंवशी, आरोग्य निरीक्षक कृष्णात मोहिते, जिल्हा साथ, रोग अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, तालुका वैद्यकिय अधिकारी पी. एस. दातार, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे पंकज काळे, सरपंच उदयसिंह पाटील आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ. माने यांनी नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत. साथीचे आजार पासरण्याआधी नागरिकांनी ते होऊ नये, याची काळजी घ्यावी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काविळ साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
सरपंच उदयसिंह पाटील, उपसरपंच मकरंद बोराडे, ग्रामविकास अधिकारी अनुपमा सिदनाळे यांनी गावातील काविळ रुग्णांची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द पिंपळे म्हणाले, साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गावात सध्या ३४ रुग्ण असून नागरिकांनी घाबरु नये. लोकांनी पाणी उकळून थंड करुन प्यावे.हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी मोकाशी यांनी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने उपचार आणि प्रबोधन करण्याचे काम सुरु आहे. रक्त चाचण्या मोफत आहेत. ग्रामपंचायत स्थापित रुग्णालयातील सुविधेचा उपयोग करुन घ्यावा, असे सांगितले.