हातकणंगले आणि नेज या गावांसाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यावेळी नेजसाठी दिवसाकाठी तीन तास, तर हातकणंगलेसाठी २१ तास पाणी घेण्याचे ठरले. कालांतराने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामध्ये नेजसाठी सहा आणि हातकणंगलेसाठी ३८ तासांचा ठराव करण्यात आला. मात्र, आता नेजसाठी सुमारे तेरा तास पाणीपुरवठा होत असल्याने हातकणंगलेकरांना आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे.
त्यातही कधी वीजपुरवठा खंडित, पाणी गळती तर कधी मोटर बंद अशा या ना त्या कारणाने वारंवार पाणीपुरवठा बंद असतो. वर्षाकाठी १२०० रुपये पाणीपट्टी आकारली जात असताना आणि नदीत मुबलक पाणीसाठा असतानाही वर्षातून केवळ १०० दिवसस पाणी मिळत असल्याने नागरिकांतून या व्यवस्थेविरोधांतच संताप व्यक्त केला जात आहे.