घरकुल विभागात लाभार्थ्यांकडून होणारी लूट नूतन गटविकास अधिकारी बंद करणार का? घरकुल लाभार्थ्यांचा सवाल…..

सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जातात. या योजननांमुळे सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होण्यास मदत होते. सरकारची घरकुल योजना देखील सर्वसामान्यांच्या खूपच उपयोगाची ठरत आहे. पण अनेक ठिकाणी घरकुले पूर्ण होऊन देखील घरकुलाची बिले नागरिकांच्या खात्यावर जमा होत नसल्याकारणाने नागरिकांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे घरकुल पूर्ण करण्यासाठी पहिले बिल निघाल्यानंतर घराचे बांधकाम पूर्ण करा असा तगादा लावण्यात येतो.

तर दुसरीकडे घरकुल बांधकाम पूर्ण केले असले तरीही बिले काढण्यासाठी लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय घराची बिले लाभार्थ्यांच्या खात्यात सोडत नसल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. लाभार्थी हे घर बांधण्यासाठी कर्ज काढून घराचे बांधकाम करतात. पण लाभार्थ्यांना खात्यावर वेळेवर बिले मिळत नसल्यामुळे लाभार्थी हे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

सांगोला पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकारी हे आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय बिलाचे काम करत नाहीत. लाभार्थ्यांना बिलाची माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच जे लाभार्थी घरकुल विभागातील नेमलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन करतात त्यांचीच फक्त बिले आनंदाने त्यांच्या खात्यावर सोडली जातात.

जे लाभार्थी ह्या नेमून दिलेल्या एजंटला लक्ष्मी दर्शन करत नाहीत त्यांची बिले मुद्दाम पेंडिंग ठेवली जातात. सांगोल्याचे नूतन गटविकास अधिकारी घरकुल विभागात लाभार्थ्यांकडून होणारी लूट बंद करणार का? तसेच घरे बांधलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचे आदेश देणार का? असा सवाल घरकुल लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.