शुक्रवार दि २९ रोजी सांगोला येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राहिलेल्या दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पराभवाचे चिंतन करण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला हजारो दिपकआबा प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, मी सत्तेचा सारीपाट घेऊन जन्माला आलो नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली आणि पराभवाला सुद्धा ताठ मानेने सामोरा गेलो मी माझ्या पूर्वजांची पुण्याई सांगून आणि जाती पातीचे राजकारण करून मते मागितली नाहीत.
प्रचंड आर्थिक ताकद आणि घाणेरडे राजकारण याला नाकारून ५१ हजार स्वाभिमानी मतदारांनी स्वतःच्या मताची पैशांत किंमत न करता माझ्यावर विश्वास ठेवला याच स्वाभिमानी मतदारांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेच्या आग्रहाखातर आणि केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवली झालेला पराभव मान्य करून दुसऱ्या दिवसापासून आपण पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झालो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे जात पात पक्ष पार्टी न पाहता प्रामाणिकपणे काम करत राहीन.
३० ते ३५ वर्षात कधीच सत्ता मिळावी म्हणून काम केले नाही. ३५ वर्षातील फक्त ६ वर्षे विधान परिषदेचा आमदार म्हणून सत्ता मिळाली बाकी कधीच सत्तेचा लोभ धरला नाही. निस्वार्थ सेवा हा साळुंखे पाटील कुटुंबाचा धर्म आहे हीच शिकवण मला स्व ह भ प शारदादेवी साळुंखे यांनी दिली आहे. याच विचारावर शेवटच्या शसापर्यंत काम करत राहणार असल्याचेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले. तसेच या निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, अभिषेक कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे आवर्जून विशेष आभार मानले.
