इस्लामपूर येथे राजारामबापू पाटील नाट्यगृह हे सर्वांच्या नजरेत आहे. परंतु या नाट्यगृहाची सध्या अवस्था खूपच मोडखळीस आलेली आहे. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून नाट्यरसिक आणि बहुतांशी सादरीकरण होणाऱ्या कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. राजारामबापू पाटील नाट्यगृहाची अवस्था वरून कीर्तन आतून तमाशा अशीच झाली आहे. नाट्यगृह नूतनीकरणासाठी ५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध करण्यामध्ये लोकप्रतिनिधींची ताकद तोकडी पडली आहे. मध्यंतरीच्या काळात विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी नाट्यगृह नूतनीकरणासाठी २ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी केली होती. त्याकडेही शासनाने दुर्लक्ष केले.
इस्लामपूर पालिकेने नाट्यगृह दुरुस्ती आणि साऊंड सिस्टिममध्ये लाखो रुपये खर्ची टाकले. परंतु नाट्यगृहाची परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे. काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहातील छतच कोसळला. यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. त्यानंतर शहरात होणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमांना ब्रेक लागला. शहरात कार्यक्रमांसाठी खासगी हॉल उपलब्ध नाहीत. कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालये भरमसाठ भाडे आकारतात. नाट्यगृह दुरुस्तीसाठी समितीही नेमण्यात आली होती. समितीने फक्त कागदावरचा खेळ करून संपवला.
शहरात विविध संस्था व्यावसायिक नाटकांना प्राधान्य देऊन आणतात. काही संस्था सभासद करून वर्षभरात नाटकाचे कार्यक्रम राबवतात. परंतु त्यांचाही व्यवसाय अडचणीत आला आहे. शाळा नाट्यगृहात स्नेहसंमेलन कार्यक्रम घेतात. काही संस्थांच्या वार्षिक सभा नाट्यगृहातच होतात. सध्या नाट्यगृहाची अवस्था दयनीय झाली आहे. यासाठी पालिका प्रशासनाला ५ कोटींचा निधी मिळणे गरजेचे आहे.