सुलतानगादे येथील महामार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी

खानापूर घाटमाथ्यावरील महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुलतानगादे गावातून जाणारा रस्ता व हिवरे येथील पुलावरील रस्ता वगळता सगळीकडे पूर्ण करण्यात आले आहे. सुलतानगादे येथील एक किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरण न केल्यामुळे जुना डांबरी रस्ता तसाच ठेवण्या आला होता. या रस्त्यावर सततच्या पावसामुळे व मोठ्या वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडले होते. खड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले होते. महामार्ग व्यवस्थापनाकडे सरपंच, व ग्रामस्थांनी सतत मागणी करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

ग्रामस्थांनी मुरमाच्या साह्याने हे खड्डे मुजवले होते. मात्र हा मुरूम वर येऊन रस्त्याची सतत दुरवस्था होत होती. रस्त्याच्या या खराब अवस्थेमुळे वाहनधारक व नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या रस्त्याच्या दुरवस्थेवर सातत्याने आवाज उठविला होता. अखेर महामार्ग व्यवस्थापनाला जाग आली असून, हे खड्डे डांबर व खडीने मजवण्यात आले आहेत. या रस्त्यावरील खड्डे मुजवून तात्पुरता उपाय करण्यापेक्षा, या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरु लागली आहे.