राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मोठं भाष्य केलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी विधानसभेतील शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रोहित आर आर पाटील यांची राष्ट्रवादी विधानसभेतील शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसच पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पाच वाजल्यानंतर जवळपास 8 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रात मतदान वाढलं. मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. याबाबतीत सर्वांनी चिंता व्यक्त केली. हे मतदान कसं वाढलं आम्हाला असं सांगण्यात आलं की, ईव्हीएम मशिन सिम्पल कॅल्क्यूलेटर आहे. मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतदान वाढत जाणं. मतदान पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडेवारी दिली जाते, त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे. आमच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकटवाडी येथील जनतेनं एकत्रित येऊन निर्णय घेतलाय की, जे मतदानं झालंय तसं होणार नाही. निवडून आलेले उत्तम जानकर यांच्या मतदारसंघात मरकटवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू.
मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि माध्यमांसमोर त्याची मतमोजणीही होईल, असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.जयंत पाटील माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, विधिमंडळातील विधानसभेचे, विधानपरिषदेचे सदस्य आज उपस्थित न झाल्याने विधिमंडळ नेत्याबाबत पुढील काळात अधिवेशन चालू असताना बैठक होईल. त्यावेळी त्याचा निर्णय होईल. आज सर्व दहापैकी नऊ सदस्य उपस्थित होते. विधिमंडळात राष्टवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल. आमची संख्य कमी जरी असली, तरी महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील असंही पाटील म्हणाले.