विट्यात उपजिल्हा रुग्णालयास एकनाथ शिंदेकडून मंजूरी!

अत्यंत आवश्यक असलेल्या उपजिल्हा रुग्णालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाबर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खास बाब म्हणून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय विटा येथे व्हावे अशी मागणी केली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. परंतु काही तांत्रिक बाबीमुळे सातत्याने विलंब लागत होता. पण आता यश आले आहे.

विटा शहराची वाढती लोकसंख्या आणि तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण लक्षात घेता या ठिकाणी सर्व सोयीने युक्त उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी नागरिकांची मागणी होती. कोरोना सारख्या महामारीने आरोग्य सुविधांची कमतरता जाणवून दिली. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्यास आता मुख्यमंत्री शिंदे यांनी खास बाब म्हणून मंजुरी दिली आहे.