विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले त्यानंतर 15 दिवस मुख्यमंत्री पदावरून भाजप, एकनाथ शिंदे शिवसेनेत मतभेद सुरू होते. अखेर काल गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्या सोहळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता होती मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार आठवड्याभराने लांबणीवर पडलेला आहे.
सांगली जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले असून आठ पैकी पाच आमदार निवडून आलेले आहेत. भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास भैया बाबर यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे. दिवंगत नेते अनिल बाबर यांना मंत्रीपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र त्यांचे निधन झाल्याने संधी गेली होती. आता सुहास बाबर यांना ही संधी मिळण्याचा दावा केला जातो. परंतु इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. विस्तार लांबल्याने इच्छुक वेटिंगवर राहिलेले आहेत.