इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणूक कोण जिंकणार? सर्वांचं लागले लक्ष….

इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. इच्छुकांनी सर्वोतोपरी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने एकत्रपणे या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. तर महायुतीमधील विस्कटलेली घडी पाहता भाजप (BJP) शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महापालिकेच्या निवडणुकीवरून बेबनाव असल्यामुळे आतापासूनच सर्वच कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील इच्छुक अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले. उमेदवाराच्या प्रचाराबरोबरच आपलाही प्रचाराचा टप्पा त्यांनी पूर्ण केला आहे. शिवाय आर्थिक गोष्टीतही इच्छुकांनी आपलीच कमांड ठेवून आयती संधी साधून घेतली आहे.

त्यामुळे आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी महापौर पदावर दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही स्वबळावर लढू अशीच भूमिका दोन्ही गटांची सध्या तरी दिसून येत आहे.