इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने पुन्हा पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहराला होणारा पाणी उपसा पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने नदीचे पाणी प्रदूषित होऊन पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत होता तसेच पाण्यावर हिरवट रंग पसरल्याने पंचगंगा नदीतून होणारा उपसा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बंद केला होता. पंचगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबल्यानंतर इचलकरंजी येथील बंधाऱ्यापाशी गळती असल्याने पाणी साठा होत नव्हता.
परिणामी नदीची पाणी पातळी सातत्याने घटत जात होती असा प्रकार वारंवार होत असल्याने महापालिकेच्यावतीने बंधाऱ्यावरील सर्व बर्गे हे लोखंडी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच बंधाऱ्याला पडलेले बगदाड मुजवून घेण्यात येणार आहे. याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून मार्च अखेर पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी पाणी साठा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
