सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याची गाडी फोडण्यात आली आहे. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे, त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघात नुकतीच तिरंगी लढत झाली होती. शिवसेना महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला आहे. तर, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपक साळुंखे यांनाही पराभव पत्करावा लागला.
राज्यात एवढ्या जोरदार संख्याबळाने महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, शहाजी बापू पाटील यांना घरीच बसावं लागलं. त्यातच, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर दुपारी त्यांचा पुतण्या सागर पाटील यांची गाडी अज्ञात तरुणाने दगड मारून फोडली. विशेष म्हणजे या वेळेला कार्यालयात बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला. मात्र, दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला आहे.