बारावीनंतर एक वर्षाचा गॅप घेऊन नीट आणि जेईई परीक्षा द्यावी का ? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. बारावीनंतर गॅप घेऊन एखादी परीक्षा देण्याचा निर्णय घेणं सोपं नाही. कारण या एका निर्णयावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. दरवर्षी 30 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी जेईई आणि नीट परीक्षेसाठी अर्ज करत असतात. त्यातील काही विद्यार्थी या परीक्षेत पास होऊन चांगल्या इंजिनीअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवतात. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसोबत नीट किंवा जेईईसारख्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही तर एक वर्षाचा गॅप घेऊन मग नीट आणि जेईईची परीक्षेची तयारी करतात.
काही विद्यार्थी बारावीनंतर एक वर्षाचा गॅप घेऊन दुसरा एखादा कोर्स करतात. बारावीनंतर एक वर्ष गॅप घेण्याचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. यासाठी तुमच्या आर्थिक परिस्थितीसह इतरही बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो.

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला खूप महत्त्व आहे. या परीक्षेची तयारी करत असतानाच जेईई आणि नीट परीक्षेची तयारी करणं थोडं अवघड आहे. जेईईच्या परीक्षेची तारीख ही प्री बोर्ड परीक्षेच्या आसपास आणि बोर्डाच्या परीक्षेच्या आधी ठेवण्यात येते. या परीक्षेच्या अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांना सहन होत नाही. त्यामुळे बारावीनंतर एक वर्ष गॅप घेऊन जेईई, नीट परीक्षा देणं योग्य ठरतं.

बारावीनंतर एक वर्ष गॅप घेऊन जेईई, नीट परीक्षा देण्याचे फायदे
बोर्डाची परीक्षा आणि जेईई, नीट परीक्षेत 1 वर्षाचा गॅप घेऊन विद्यार्थी अधिक चांगला अभ्यास करु शकतात. यामुळे बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शनही कमी होतं. बारावीच्या परीक्षेनंतर 1 वर्ष गॅप घेऊन विद्यार्थी त्यांना कठीण वाटत असलेल्या विषयांचा जास्त अभ्यास करु शकतात. दोन अवघड परीक्षा देत असताना 1 वर्षाचा गॅप घेतल्याने मेंटल स्ट्रेस कमी होतो . या काळात कॉलेज आणि कोर्सविषयीची माहिती शोधता येते.
एक वर्षाचा गॅप घेतल्यावर त्या काळात तुम्ही कोचिंग क्लासेसला जाऊ शकता. कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये एखादा कोर्स करु शकता . त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही. अनेक विद्यार्थी बारावीनंतर गॅप घेऊन जेईई, नीट परीक्षा देत असतात. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असू शकतात. काही विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात नापास झाल्यावर एक वर्षाचा ब्रेक घेतात. तर काही विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेचा आणि जेईई, नीटचा एकाच वेळी अभ्यास करता येत नाही, म्हणून ब्रेक घेतात.

बारावीनंतर एक वर्ष गॅप घेऊन जेईई, नीट परीक्षा देण्याचे तोटे
एक वर्षाचा गॅप घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. आपण इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे आहोत, असं त्यांना वाटायला लागतं. बारावीनंतर एक वर्ष गॅप घेऊन जेईई, नीट परीक्षा दिल्याने नोकरी तुम्ही एक वर्ष उशीरा सुरु करता. त्यासाठी तुम्ही आधीच आर्थिक तयारी करायला हवी. तुम्ही एक वर्षाचा गॅप घेऊन जेईई, नीट परीक्षा दिली म्हणून पहिल्याच फटक्यात तुम्ही पास व्हाल, याची काही गॅरंटी नाही. ड्रॉप इयरवाल्या विद्यार्थ्यांवर परीक्षेत पास होण्याचं जास्त प्रेशर असतं.
