खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीची रंगू लागली रंगतदार तालीम

संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आलेले आहे. विधानसभा निवडणुकीची रंगतदार तालीम ही खानापूर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच रंगू लागलेली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे माजी जि. प. उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर अशी महायुतीतील मातब्बर नेतेमंडळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात आता नव्याने भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची देखील भर पडलेली असून त्यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकलेला आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे देशमुख यांची महायुतीशी पर्यायाने भाजपशी काडीमोड पक्की मानली जात आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर कायमच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केलेला आहे.

कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकून महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारच आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थांबणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघात रंगतदार तालीम आतापासूनच रंगू लागलेली आहे.