जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच!सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक…

थकीत कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी अडीच लाखांच्या लाचेची मागणी करून १ लाख ८० हजार रुपये स्वीकारणारा इंडियन बँकेचा कायदा सल्लागार ॲड. विजय पाटणकर (रा.इचलकरंजी) याला अटक झाली.

सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १०) रात्री इचलकरंजी येथे कारवाई केली. या कारवाईने इचलकरंजीसह जिल्ह्यात खळबळ उडाली. तक्रारदारांनी इंडियन बँकेच्या इचलकरंजी शाखेकडून कर्ज घेतले होते.

सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याने त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बँकेने पाठवली होती. मात्र, घरात मंगलकार्य असल्याने जप्ती पुढे ढकलावी, अशी विनंती तक्रारदारांनी बँकेचे कायदा सल्लागार ॲड. पाटणकर याच्याकडे केली. जप्ती पुढे ढकलण्यासाठी पाटणकर याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

अखेर १ लाख ८० हजार रुपयांवर तडजोड झाली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेऊन तक्रार दिली. राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराच्या विरोधात तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी याची माहिती पुणे येथील सीबीआयच्या अधिका-यांना दिली.

तक्रारीची पडताळणी करून तातडीने मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम घेताना ॲड. पाटणकर रंगेहाथ सापडला. तो सध्या सीबीआयच्या अटकेत असून, अधिक चौकशी सुरू आहे.