आष्टा येथील पोपट शिंदे या शेतकऱ्याने वाल घेवड्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊन कमी खर्चात दहा गुंठ्यांत पाच टन उत्पादन मिळेल. यातून तीन लाखांपर्यंत नफा मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच शेतात उसासह भाजीपाल्याची लागवड केली आहे. शेतीचा पोत चांगला ठेवण्यासाठी पोपट शिंदे नेहमी सेंद्रिय खताला प्राधान्य देत आहेत. शेणखतासह सेंद्रिय खते देऊन जमिनीची सुपीकता वाढवण्यात येत आहे.
दोन वर्षांपासून शिंदे यांनी दहा गुंठे क्षेत्रावर कोबी, फ्लॉवर, शेवगा, टोमॅटो, काकडी यांसारखी पिके घेतली आहेत. पोपट शिंदे व कुटुंबीयांनी शेतीची मशागत करून सप्टेंबरमध्ये ‘डीएलएच ९६८’ जातीच्या वाल घेवड्याची टोकन केली. पाच बाय चार फुटांवर दोन बियांची टोकन केली. तार व काठी बांधली असून ‘ठिबक’च्या साह्याने नियमित पाणी दिले. या वाल घेवड्याला आठ ते पंधरा दिवसांनी लिंबोळी व करंजी पेंड पिकाच्या मुळाला दिली.
तसेच गूळ, अंडी, ताक यांच्या मिश्रणाची फवारणी केली. ठिबकमधून गोमूत्र व शेण आठ दिवसांनी देण्यात येते. नोव्हेंबरमध्ये शेंगा सुरू झाल्या. सध्या एक दिवसाआड १५० किलो उत्पादन मिळत आहे. त्यास प्रतिकिलो ६० रुपये दर मिळत आहे. आजअखेर एक टन उत्पादन मिळाले असून वर्षभरात पाच टन उत्पादन मिळेल. यातून तीन लाख उत्पन्न मिळेल, असा विश्वास पोपट शिंदे यांनी व्यक्त केला.