आष्टा येथील दत्तवसाहत मधील चार-सहा नऊचा प्रश्न निशिकांतदादांच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन…..

विकासकामांचा धडाका अनेक भागात सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे. आष्टा शहरात देखील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. आष्टा येथील दत्तवसाहत मधील सांस्कृतिक भवनासमोर सर्वे क्रमांक चार, सहा, नऊ मधील नागरिकांची बैठक झाली, याप्रसंगी ते बोलत होते. साईनगर, गांधीनगर, दत्तवसाहत मधील नागरिक उपस्थित होते. आष्टा शहरातील सर्वे क्रमांक चार, सहा, नऊ मधील जमीनीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. येथील नागरिकांनी प्रयत्न करूनही प्रश्न सुटलेला नाही.

यावेळी उपस्थित नागरिकांनी साईनगर, दत्त वसाहत आणि गांधीनगर मधील प्लॉट धारकांच्या अडचणी सांगितल्या. सर्वे क्रमांक चार, सहा, नऊचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची प्रवीण माने यांच्याकडे मागणी केली. निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे प्रतिपादन यावेळी भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांनी केले.

 प्रवीण माने म्हणाले, आष्टा शहरातील सर्वात मोठा प्रश्न सर्वे क्रमांक चार, सहा आणि नऊचा आहे. जमिनीची खरेदी विक्री करता येत नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. यामागील काळामध्ये शासनाने आडमुठी भूमिका घेतली होती. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.आष्टा येथील साईनगर, गांधीनगर, दत्त वसाहत येथील सर्वे क्रमांक चार सहा नऊचा प्रश्न सुटण्यासाठी निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. हा प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करणार आहोत असे सांगितले.