परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतची तोडफोड करण्यात आली. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. यातील मुख्य आरोपीचा शोध घेऊन शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीचे पोलिस निरीक्षक विनय बहिर व तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन घटनेच्या मूळ सूत्रधाराला शोधून त्याला तत्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना होत असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे.
संपूर्ण राज्यात आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात घटनेचा तीव्र निषेध म्हणून विविध प्रकारचे आंदोलने मोर्चे निघत आहेत. जातीयवाद्यांकडून खोडसाळपणे व समाजातील शांतता भंग करण्यासाठी जाणीव पूर्वक असे प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनाने यावर कडक भूमिका घेत अशा समाजद्रोह्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजित ऐवळे-पाटील, अमोल लांडगे, रवी लांडगे, शशिकांत मोटे, नामदेव खरात, शरद वाघमारे, विवेक सावंत, पोपट कासार, रघुनाथ कांबळे, नामदेव केंगार, मुकेश सवणे, अंकुश मुढे, मारुती ढोबळे, नवनाथ जावीर, राजेश मोटे, विलास धांडोरे, समाधान खरात उपस्थित होते.