इचलकरंजी,जर्मनी गँगची दहशत माजवत खुनाची सुपारी मिळाली असून धंदा करावयाचा असेल तर दरमहा ३० हजार रुपयांची खंडणी मागत जबरदस्तीने ७०० रुपये काढून घेतल्याप्रकरणी | शिवाजीनगर पोलिस ‘ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण आण्णाप्पा वडर (वय ३० रा. साठेनगर कबनूर), मेहबुब ईस्माइल उकली (वय २४ रा. जवाहरनगर) आणि सचिन उर्फ शाम बाळासोघोरपडे (वय २४(रा. कबनूर) अशी त्यांची नांवे आहेत. यापैकी सचिन घोरपडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून करण वडर हा फरार आहे. तर मेहबुब उकली हा सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी हुसैन बशीर मुजावर (वय ४० रा. मुजावर गल्ली कबनूर) यांनी फिर्याद दिली आहे. मे २०२५ मध्ये कबनूर चौक येथील जर्मनी गँगमधील करण वडर व मेहबुब उकली यांनी हुसैन मुजावर यांना तुझ्या खुनाची सुपारी मिळाली असून तुला धंदा करावयाचा झाल्यास आम्हांला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्याला मुजावर यांनी नकार दर्शविला असता करण वडर याने जबरदस्तीने खिशातील ७०० रुपये काढून घेतले. तसेच पैसे नाहीत म्हणतोस अशी विचारणा करत शिवीगाळ करत कमरेला लावलेली गुप्ती दाखवत तुला जिवंत रहायचे आहे की नाही, जर्मनी गँगला खोटे बोलू नको, तुझा काटा काढायला वेळ लागणार नाही. तुला धंदा करावयाचा असेल तर आम्ही ज्या ज्यावेळी पैसे मागेन त्यावेळी गप्प पैसे द्यावे लागतील, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. तर शाम घोरपडे याने ६ जुलै २०२५ रोजी कबनुर ग्रामपंचायतीजवळ मुजावर यांना फोन करुन शुभम पट्टणकुडे याच्या जामीन खर्चासाठी ३० हजार रुपयाची मागणी केली. त्याला मुजावर यांनी नकार दिल्याने घोरपडे याने पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही असे धमकावत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करु देण्यासाठी तिघांकडूनही खंडणी मागितली जात असल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. अधिक तपास सपोनि शरद वायदंडे करीत आहेत.
