कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जणांना कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीला बूस्टर डोस मिळाला आहे. इतकेच नव्हे तर पक्षातीलच नवे नेतृत्व तयार करण्यासाठी नामी संधी मिळाली आहे.विशेषत: पक्ष फुटी नंतर आमदार प्रकाश अबिटकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर दुसऱ्या गटांकडून गद्दारीचा शिक्का लावण्यात आला होता. तर मुश्रीफ यांनी कागल पुरताच राष्ट्रवादी मर्यादित ठेवण्याचा आरोप राष्ट्रवादी दुसऱ्या गटाकडून करण्यात आला होता. मात्र मंत्रिपदानंतर पक्षाचे जाळे विस्तारित आणि नव्या नेतृत्वांना पुढे आणण्याची संधी दोघांनाही चालून आली आहे.
राष्ट्रवादीतून एकमेव आमदार निवडून आल्यानंतर त्यांच्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची स्थिती पाहता राज्य स्तरावर दुसरा चेहरा नसल्याने राष्ट्रवादीच्या सीमा मर्यादित झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर राष्ट्रवादीला नवा चेहरा आणि नव्या नेतृत्वगुणांना पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा गड मजबूत करण्याची संधी मुश्रीफ यांच्यापुढे आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्याची पुनर्बांधणी करण्यासाठी अबिटकर यांच्या रूपाने मंडलिक गटाला ताकद मिळणार आहे. मंडलिक गटाचे असणारे चार ते सहा विधानसभा मतदारसंघातील जाळे पुन्हा एकदा घट्ट होण्यासाठी मदत होणार आहे. राज्याची जबाबदारी मिळाल्यानंतर अबिटकर यांना यांना मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. साठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारणीचं मोठे आव्हान अबिटकर यांच्यापुढे आहे.
