विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी महायुतीतील जयंतरावांचा इस्लामपूर मतदारसंघ आपल्याकडे घेत तिथून जयंतरावांना कडवे आव्हान उभे केले. गेली ३५ वर्षे इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. सलग सात विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याचा आलेख वाढतच गेला. आठव्या विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का एकदमच घसरला. याची कारणमीमांसा सुरू असून, त्यामध्ये पाटील यांच्याभोवती चार बापूंची असलेली अभेद्य भिंत हे प्रमुख कारण व अडथळा कार्यकर्त्यांना वाटत आहे.
या बापूंच्या भिंतीमुळेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नव्या कार्यकर्त्यांना साहेबांपर्यंत पोहोचता येत नसल्याचे आता समर्थक बोलू लागले आहेत. उरूण परिसरातील बाळासाहेब पाटील (बापू) यांची राजकीय कारकीर्द राजारामबापू पाटील यांच्यापासून सुरू झाली. त्यांना थेट पाटील यांच्या दरबारात प्रवेश मिळतो. याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांतून नेहमीच असते. नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील (बापू) सुध्दा पाटील यांच्या जवळचे मानले जातात.
ग्रामीण भागातील निर्णय घेताना संजय पाटील यांचाच शब्द प्रमाण मानला जातो. राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील (बापू) सध्या जयंत पाटील यांचे खास असल्याचे मानले जातात. प्रतीक पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली, तरी विजय पाटील यांच्या सल्ल्यानेच आणि जयंत पाटील यांच्या आदेशानेच कारभार चालतो.
त्यानंतर शहरातील कारभार शहाजी पाटील (बापू) यांच्या हाती असला तरी जयंत पाटील हे अॅड. चिमण डांगे (भाऊ) व खंडेराव जाधव (नाना) यांचाही सल्ला घेतात. एकंदरीत, पाटील यांच्या कारभारात चार बापूंना महत्त्व आल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
