हातकणंगले ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, पण नगरसेवकांची आणि अधिकाऱ्यांची खाबुगिरी एवढी वाढली की पाचच वर्षांत भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून हातकणंगले नगरपंचायतीची ख्याती झाली. प्रत्येक कामामध्ये कमिशन खाण्याची सवय, त्याशिवाय कामच पुढे जात नाहीत. असंच एक प्रकरण नुकतंच घडलं आहे. मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाला पाणी पुरवण्यासाठी 56 लाखांच्या योजनेमध्ये समाकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरपंचायत अधिकारी-नगरसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय.
माळभागातल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी त्या परिसरात दोन-तीन लाख रुपये खर्च करून दोन बोअर मारणे किंवा जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीमधून पाणी आणणे शक्य होतं असं ग्रामस्थांचं मत आहे. पण एक-दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या दूषित विहिरीतून पाणी आणण्याचा घाट घातला आणि जाता-जाता समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी 56 लाखांचा ढपला पाडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी आता केली जात आहे.
ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. ग्रामस्थांना वाटलं आता तरी गाव सुधारेल, विकास कामं होतील. पण आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. विकास कामं तर सोडाच, पण नुसता वाढलेली पाणीपट्टी, वीज बिल आणि घरपट्टी देऊनच ग्रामस्थ वैतागले आहेत.
हातकणंगले नगरपंचायतीच्या नगरसेवकांना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यातील अनेकजण पुन्हा एकदा नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्जही झाले आहेत. पण या पाच वर्षांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी असताना प्रत्येक कामात कमिशन खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. त्यामुळे नगरपंचायत जिल्ह्यात बदनामी झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनीच आता या प्रकरणात लक्ष घालावे आणि वसतिगृहाला पुरवठा करण्यात येणाऱ्या या कामात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढावा. कमी खर्चात पाणी पुरवणे शक्य असतानाही कमिशनचा ढपला पाडण्यासाठीच ही योजना राबवली आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे.