रेंदाळच्या सराफाला बोरगांव-जंगमवाडी रोडवर धूम स्टाईलने लुटले

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील सराफाला तीन चोरट्यांनी बोरगांव-जंगमवाडी रोडवर धूम स्टाईलने सॅक लंपास केली. सराफाकडील सुमारे ३ लाख ३७ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने असलेली सॅक चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी शिवाजी दिनकर जाधव यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. रेंदाळ येथील शिवाजी जाधव यांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय असून त्यांचे घोसरवाड येथे जाधव ज्वेलर्सचे दुकान आहे. ते दररोज रेंदाळ-घोसरवाड ये-जा करतात. शुक्रवारी रात्री जाधव यांनी दुकान बंद केले व दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका सॅकमध्ये भरुन ते मोटारसायकलवरुन रेंदाळकडे निघाले होते.

घोसरवाड – जंगमवाडी रोडवरील व्हाईट हाऊस बारच्या पुढे आले असताना अचानकपणे पाठीमागून दुचाकीवरुन तिघेजण आले व त्यांनी जाधव यांनी पाठीवर अडकविलेली सॅक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत जाधव हे मोटारसायकलवरुन खाली पडले. त्यावेळी त्या चोरट्यांनी मारहाण करत व कोयत्याच्या उलट्या बाजूने मारत सॅक हिसकावून घेत पलायन केले. सॅकमध्ये ४३ हजार ८०० रुपयांचे गळ्यातील पेंडल, १८ हजाराच्या सोन्याच्या बाली, १२ हजाराच्या लहान अंगठ्या, ७५०० रुपयांच्या अष्टपैलु लाखी, ९६०० रुपयांच्या सोन्याच्या नथी, ४८०० रुपयांचे गळ्यातील बदाम, १५०० रुपयांच्या सोन्याच्या नथ, १ लाख २६ हजाराचे चांदीचे पैंजण, २४ हजाराचे लहान मुलांचे कडल्या, १९ हजार २०० रुपयांच्या चांदीच्या १३५ अंगठ्या, ४३ हजाराचे चांदीचे १० ब्रेसलेट, १६ हजाराचे चांदीचे लहान मुलांचे करदोडे असा ३ लाख ३७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.