शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प हातकणंगले तालुक्यातील किणी येथे कार्यान्वित झाला असून या प्रकल्पातून १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच कार्यान्वित झाला असून त्यातून ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतीला दिवसा वीज पुरवठा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २००६ झाली आहे.
राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून जिल्ह्यातील दुसरा दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प किणी येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे महावितरणच्या ११ केव्ही भादोले व ११ केव्ही घुणकी या कृषी वाहिन्यांवर असलेल्या वाठार, किणी व घुणकी या गावांतील १२१६ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.