जावयाकडून सासर्‍याचा दगड, फरशीने ठेचून खून! पत्नी नांदायला येत नसल्याने…….

अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. खून, मारामारी, चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत होत राहिलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन हे धोक्यात आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार इचलकरंजीमध्ये उघडकीस आलेला आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून जावयाने साथीदारांसह सासर्‍याचा दगड व फरशीने ठेचून खून केला.

जावेद बाबू लाटकर (वय 42, रा. आझाद गल्ली, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना तीन बत्ती चौक परिसरात बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर संशयित सिकंदर मोहम्मद अली शेख या जावयाच्या दुचाकीची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. षटकोन चौक परिसरात राहणार्‍या शेख याचा विवाह जावेद लाटकर यांच्या मुलीशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच कौटुंबिक कलहातून शेख याची पत्नी माहेरी राहण्यास आली.

त्यानंतर पत्नी आपल्याकडे राहायला यावी यावरून शेख याचा सासरच्या मंडळींबरोबर सातत्याने वाद होत होता. सासरे मुलीला पाठीशी घालत असल्याचाही शेख याला राग होता. याच रागातून बुधवारी रात्री सिकंदर शेख हा दुचाकीवरून साथीदारांबरोबर आझाद गल्लीत राहणारे सासरे लाटकर यांच्या घरासमोर आला. तेथे मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळ करू लागला. त्यानंतर सासरे लाटकर यांनी घराबाहेर येऊन शेख याला या गोष्टीचा जाब विचारला.

त्यावेळी शेख लाटकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना ढकलत नेत गटारीजवळ खाली पाडले. अन्य साथीदारांना हत्यारे काढा, असे सांगत त्याने सासरे लाटकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. त्यांचे तोंड व डोके दगडाने ठेचले. घाव वर्मी बसल्याने लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सिकंदर शेख हा साथीदारांसोबत दुचाकी तेथेच टाकून पळून गेला.

लाटकर यांना तातडीने इंदिरा गांधी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. शेख याचे चिकन विक्रीचे दुकान असून, यापूर्वी तलवार घेऊन भागात दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.