पारगाव येथील जंगलात गव्यांचा वावर !

घुणकी पारगाव (ता. हातकणंगले) येथील वन विभागाच्या जंगलात गव्यांचे दर्शन दिल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण आहे. पारगाव हद्दीतील विनयनगर, पाडळीनजीक वनविभागाचे जंगल आहे.

येथून सादळे-मादळे मार्गे जोतिबा डोंगराकडे जाण्यास मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा गव्यांनी सादळे मादळेतून अंबप, तळसंदे मार्गे घुणकीपर्यंत प्रवास केला आहे. काल सायंकाळी पाडळी-पारगाव रस्त्याला लागून असलेल्या खडी परिसरात स्थानिक नागरिकांना गव्यांचे दर्शन झाले. मात्र सायंकाळची वेळ असल्याने नक्की किती गवे आहेत याचा अंदाज आला नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी गव्यांचा शोध वन विभागाने घेतला होता व पावनगड जंगलातून भटकलेले सोळा गवे पन्हाळा वन विभाग व जिल्हा विभाग यांच्या रेस्क्यू टीमने गिरोली, पन्हाळा परिसरातून त्यांच्या अधिवासात मार्गस्थ केल्याचे सांगितले होते. मात्र गवे अद्यापही या परिसरात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.