जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्रासाठी ‘ही’ कागदपत्रे जोडून अर्ज करा, १५ ते ९० दिवसांत मिळेल दोन्ही दाखले

शिक्षण, राजकारण यासह अनेक कारणांसाठी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते. आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी लागलेल्यांसाठीही दोन्ही दाखले बंधनकारक आहेत. अचूक कागदपत्रांसह अर्ज केल्यास अर्जदाराला जातीचा दाखला ३० दिवसात तर जात वैधता प्रमाणपत्र १५ ते ९० दिवसांत मिळते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जात प्रमाणपत्र काढल्यावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. पण, त्यासाठी ओबीसी व एसबीसी प्रवर्गासाठी १९६७ पूर्वीचे पुरावे आवश्यक आहेत. तसेच ‘एनटी’ प्रवर्गासाठी १९६१ पूर्वीचे तर एससी, एसटी प्रवर्गासाठी १९५० पूर्वीचे पुरावे अर्जासोबत जोडावेच लागतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अचूक कागदपत्रे असल्यास संबंधिताला जात पडताळणी समितीकडून १५ ते ९० दिवसांत हे प्रमाणपत्र ऑनलाइनच वितरित केले जाते.

जातीच्या दाखल्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्वांनाच शैक्षणिक पुरावे जरुरी असून त्यातील काही पुरावे नसल्यास महसुली पुरावे जोडले तरीदेखील प्रमाणपत्र मिळते. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासाठी वंशावळ महत्त्वाची असून ती अचूक असावी, असा निकष आहे.

दरम्यान, गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाइन केंद्रांवर जाऊन अर्जदाराला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. सध्या जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे बंद असून काही दिवसांत ते सुरू होतील. त्यानंतर त्याठिकाणी देखील अर्ज करता येईल. तहसीलदारांकडे जात दाखल्यासाठी केलेला अर्ज प्रातांधिकाऱ्यांकडून तपासून घेतला जातो. त्यानुसार तो दाखला अर्जदाराला वितरित होतो.

जात दाखल्यासाठी ‘ही’ कागदपत्रे-

१९६७ पूर्वीचा जातीसंबंधीचा पुरावा- अर्जदाराचा रहिवासी दाखला- शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड- अर्जदाराचा वंशावळ- दाखला मिळण्याचा कालावधी : ३० दिवसांत

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे

महाविद्यालय किंवा संबंधित कार्यालयाचे पत्र- १५-ए अर्ज- अर्जदारासह कुटुंबातील इतर सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र- नमुना ३ व १७ अर्ज (वंशावळ व कागदपत्रे खरी असल्याची शपथपत्र)- शाळेचा दाखला, अर्जदार व वडिलांचा- शैक्षणिक पुरावे नसल्यास जातीचा उल्लेख असलेले महसुली पुरावे (खरेदीखत, जन्म-मृत्यू दाखला, सातबारा, फेरफार)

जात पडताळणीसाठी ‘येथे’ करा अर्ज

www.ccvis maharashtra.com व www.barti.validity.com या संकेतस्थळावर अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे पुरेशी व अचूक असतील तर संबंधिताला १५ ते ९० दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र मिळते. पण, काही त्रुटींची पूर्तता करायला अर्जदारास सांगूनही त्याची वेळेत पुर्तता न झाल्यास प्रमाणपत्र मिळत नाही.

…तर जात पडताळणी अर्ज अवैध ठरणार

१९५० ते १९६७ पूर्वीचे पुरावे अपुरे असतील आणि कागदपत्रांमध्ये खाडाखोड असल्यास जात पडताळणी समितीकडून प्रस्ताव अवैध ठरविला जातो. कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास किंवा वंशावळ सिद्ध होत नसल्यास देखील तो प्रस्ताव फेटाळला जातो. त्यामुळे प्रस्ताव अचूक व परिपूर्णच द्यावा, असे आवाहन जात पडताळणी समितीकडून करण्यात आले आहे.