शहरातील एका व्यापाऱ्याकडून ग्रे कापड खरेदी करुन त्यापोटी बंद असलेल्या खात्यावरील तब्बल २५ धनादेश देत पैसे देण्यास टाळाटाळ करून २ कोटी ३७ लाख २४ हजार ४८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिलवाडा, राजस्थान येथील चौघांविरूध्द गावभाग पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. रजत महेश सोनी, महेश रतनलाल सोनी, रविकांत उर्फ रविराज महेश सोनी व वरुण सुर्यनारायण चौधरीअशी संशयितांची नांवे आहेत. यापैकी रजत सोनी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पंकज जतनसिंह मेहता यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पंकज मेहता यांची पंकज टेक्स्टाईल मिल्स आणि मे. पंकज सिंथेटीक्स मिल्स या नांवाच्या फर्म असून त्याद्वारे ते ग्रे कापड खरेदी-विक्रीचा व्यापार करतात. त्यांच्या या फर्ममधून वरुण चौधरी या दलालाच्या मध्यस्थीने रजत, महेश व रविराज सोनी यांनी सुक्ता टेक्स्टाईल या फर्मसाठी कापड खरेदी केले होते. त्या कापडाची परस्पर विक्री अथवा संबंधित पार्टीला न देता आणि काही कापड स्वतःकडे ठेवले होते. कापड विक्रीचे २ कोटी ३७ लाख २४ हजार ४८ रुपयांसाठी पंकज मेहता यांनी सोनी यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.
त्यापोटी सोनी यांनी बंद असलेल्या एचडीएफसी बँक भिलवाडा राजस्थान बँकेचे २५ धनादेश दिले होते. तसेच पैशाची मागणी केल्यास मेहता यांना सोनी यांच्याकडून दमदाटी केली जात होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी चौघांविरोधात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत. दरम्यान, फसवणूकप्रकरणी गावभाग पोलिसांनी रजत सोनी याला भिलवाडा येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
