सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातॊ. या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पण आता सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे.नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या सोलापूर ते उजनी या ११० किलोमीटर समांतर जलवाहिनीचे काम जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. उजनी धरणावरील पंपहाऊसवर महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी ११५० एचपीचे चार पंप बसविले आहेत. त्याचे प्रात्यक्षिक १४ जानेवारीनंतर सुरू केले जाणार असून ते पंप जुन्या पाइपलाइनला जोडले जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीनंतर सोलापूर शहराला चार दिवसाआडच, पण सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास, असे दिवसातून दोनदा पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर शहराला विशेषतः १९९२ नंतर हद्दवाढ भागाला कधीच दररोज किंवा एक दिवसाआड पाणी मिळालेले नाही. आता समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर तशी आशा आहे, पण नियमित पाण्यासाठी आणखी काही वर्षे वाटच पाहावी लागणार आहे. शहराअंतर्गत पाणी वितरणाची प्रणाली पूर्णतः बदलावी लागणार असून त्यासाठी ‘अमृत-२’चा प्रस्ताव अजून मंजूर झालेला नाही.
त्यासाठी शहरातील आमदारांना पाठपुरावा करावाच लागेल. तुर्तास, समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर तीन महिने प्रात्यक्षिक होईल आणि त्यानंतर १ एप्रिलपासून एक दिवस (तीन दिवसाआड) कमी करण्यात येणार आहे. सध्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा संपल्यावर १४ जानेवारीनंतर धरणावरील पंपाचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. त्यावेळी दिवस नव्हे तर वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सध्या सुरू असलेल्या सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. संक्रांतीनंतर उजनी धरणावरील ११५० एचपी क्षमतेच्या पंपांचे प्रात्यक्षिक होईल. जुन्या पाइपलाइनला जोडून त्याचे प्रात्यक्षिक होणार असून संक्रांतीनंतर शहराला चार दिवसाआडच पाणीपुरवठा राहील, पण चौथ्या दिवशी सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास, अशा दोन वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन आहे. जेणेकरून सर्वांना समान दाबाने पाणी मिळेल.
