आटपाडी तालुक्यात चक्क सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चाळीस हजारांवर डल्ला! चोरीचे सत्र सुरूच

अनेक भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण देखील वाढत चाललेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. बंद घरे, दुकाने यावर डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लांबीवला जातो. आटपाडी तालुक्यात देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची घरफोडी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झरे येथे चोरट्यांनी दुकान आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चाळीस हजारांवर डल्ला मारला, तर शेजारीच चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.

दिघंची, तडवळे, आटपाडी आणि त्यानंतर बनपुरी येथे घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर दिघंचीत दिवसा चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने चोरट्याने धाडसी चोरी करण्याची पावले टाकली आहेत. एक प्रकारे चोरट्याने पोलिसांना तपासाचे आव्हानच दिले आहे. मुख्याधिकारी वैभव हजारे पंचायत समिती जवळील अपार्टमेंटमध्ये राहतात. ते रजा काढून गावी गेल्यानंतर चोरट्याने त्यांचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरून नेला. यावेळी चोरट्याने शेजारील पोलिस आणि अन्य नागरिकांच्या घराला बाहेरून कड्या लावून घरफोडी केली होती.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झरे येथे मच्छिंद्र विलास गोरड यांचे दुकान आणि गोदाम फोडून दुकानात ठेवलेले चाळीस हजार रुपये चोरून नेले. यावेळी चोरट्याने सीसीटीव्हीची मोडतोड केली. दुकानात शेजारी गणेश आंधळकर, दिलीप आंधळकर, विश्वनाथ सलगर आणि रंभाजी वळकुंडे (सर्व झरे) यांची दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न केला. या ठिकाणी चोरीला गेलेल्या ऐवजाची नोंद पोलिस ठाण्यात केलेली नाही. मात्र मच्छिंद्र गोरड यांच्या चोरीची पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.