इस्लामपूर कुस्ती मैदानात जमदाडे विजयी!

इस्लामपूर येथील श्री संभूआप्पा-बुवाफन उरुसामित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा महान भारत केसरी मल्ल माऊली जमदाडेने पंजाबचा भारत केसरी मल्ल गुरुप्रताप सिंगला ‘बॅक थ्रो’ डावावर आसमान दाखवत लाख रुपयाचे रोख बक्षीस व चांदीची गदा पटकावली.येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात संभूआप्पा यात्रा कमिटीच्या वतीने कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते. प्रथम क्रमांकासाठीची मानाची चांदीची गदा समाधिस्थळावरून कुस्ती मैदानात वाजतगाजत आणण्यात आली.

या मैदानाचे उद्‌घाटन संभूआप्पा-बुवाफन मठाचे मिलिंद मठकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मानाची चांदीची गदा समाधिस्थळावरून वाजत-गाजत मैदानावर आणली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, पोलिस निरीक्षक संजय हारगुडे, हणमंत पाटील-शिरटेकर, संजय पाटील-ढोबळे, गुलाबराव पाटील-शिरटेकर, राजाराम माळी, संग्रामसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम क्रमांकासाठी माऊली जमदाडे व गुरुप्रताप सिंग यांच्यातील कुस्ती ज्येष्ठ मल्ल हणमंतराव पाटील, भास्करराव मोरे यांच्या हस्ते लावली. दोन्हीही मल्ल समान ताकदीचे असल्याने कुस्ती शौकिनांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

गर्दनखेच आणि पंजा पकडीतून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतल्यानंतर डाव-प्रतिडावाला सुरवात झाली. माऊली जमदाडेने विसाव्या मिनिटाला आक्रमक होताना आपल्या उंची व ताकदीचा पुरेपूर वापर करत गुरुप्रताप सिंगला आपल्या अंगावरून मागे टाकत ‘बॅक थ्रो’ डावावर अस्मान दाखवले.