Ichalkaranji Assembly Election : इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र सर्वानाच पहायला मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून भाजपतर्फे राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली होती. वास्तविक पक्षाकडून हाळवणकर यांचा उमेदवारीवर पहिला हक्क होता. पण पक्षाच्या निर्णयानुसार त्यांनी कट्टर राजकीय विरोधक असलेले प्रकाश आवाडे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या निर्णयानुसार हाळवणकर यांनी उमेदवारीचा त्याग केला होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इचलकरंजीत आले होते. त्यांनी हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल, असे जाहीरपणे सांगितले होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही निवडणूक प्रचारावेळी इचलकरंजीला दोन आमदार मिळतील, असे भाकीत केले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार हाळवणकर यांची विधान परिषदेवर कधी वर्णी लागणार याकडे त्यांच्यासह समर्थकांचे डोळे लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही इचलकरंजीतील कार्यक्रमात हाळवणकर यांच्या विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

केवळ चर्चा होत राहिल्यामुळे हाळवणकर समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढत होती. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे उर्वरीत ५ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग तूर्त मोकळा झाला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त उर्वरित ५ आमदारांची लवकरच नियुक्ती होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला ३ जागा आहे. यात हाळवणकर यांचे नाव निश्‍चित असल्याचे सांगितले जात आहे. ५ आमदारांमध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.