आजपासून चिकमहुद येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ…..

सध्या अनेक भागात यात्रा उत्सव सुरु आहे. छोट्या मोठ्या गावोगावी यात्रा भरविल्या जातात. हजारोंच्या संख्येने या यात्रेस भाविक आपली उपस्थिती दर्शवितात. सांगोला तालुक्यातील चिकमहुद अंतर्गत असलेल्या तांबवेवस्ती येथील श्री. खंडोबा देवाची यात्रा आज शुक्रवारपासून रविवार १२ तारखेपर्यत होणार आहे. प्रतिपाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असलेल्या तांबवेवस्ती येथील या श्री खंडोबा देवाच्या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटकासह इतर राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहतात.

श्री खंडोबाचे प्रमुख देवस्थानां पैकी सातारा जिल्ह्यातील पाली चे प्रतिरूप म्हणून तांबवेवस्ती (चिकम हूद, ता. सांगोला) येथील खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे. पाली प्रमाणेच तांबवेवस्ती येथेही पौष महिन्यातील मृग नक्षत्राच्या गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा-म्हाळसा-बानूचा विवाह सोहळा होतो. यात्रेची सुरुवात शुक्रवार (ता१०) रोजी संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाने होणार आहे. शनिवार (ता. ११) रोजी साळमुख (ता. माळशिरस) येथील करे भक्त परंपरेप्रमाणे पायी चालत जाऊन रहिमतपूर(जि. सातारा) येथील कृष्णा नदीचे पाणी घेऊन येतात.तर पडळकरवाडी व उमदी – कारंडेवाडी (ता. जत, जि. सांगली) येथील भक्त विजापूर (कर्नाटक) येथील तासबावडीचे पाणी चालत घेऊन येतात.

शिवाय महिम (ता. सांगोला) येथील शेंडे व कारंडे हे भक्त परंपरेप्रमाणे चंद्रभागेचे पाणी पायी चालत घेऊन येतात. या तिन्ही नद्यातून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक खंडोबा देवास झाल्यानंतर खंडोबा देवाचा लग्न सोहळा पार पडतो. या लग्न सोहळ्यासाठी लागणारी बाशिंगे व फुलांचे हार आणण्याचा मान परंपरेप्रमाणे सांगोला येथील विजय म्हेत्रे यांच्याकडे आहे. लग्नानंतर संध्याकाळी येथे वाघ्या म ुरळीचा कार्यक्रम होतो. रविवार (ता. १२) जानेवारी रोजी येथे बकऱ्याचा कार्यक्रम आहे. तसेच रविवारी गजीढोलाच्या स्पर्धा होणार आहेत.

रविवारी घुलेश्वर (ता. जत) येथील तांबवे भक्त पुढील वर्षभराचे भाकीत आपल्या भाकणुकीतून सांगणार आहेत. तांबवेवस्ती येथे होणाऱ्या या यात्रेला महाराष्ट्र व कर्नाटकासह इतर राज्यातून भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेच्या तिन्ही दिवशी चोवीस तास ओव्यांचा कार्यक्रम होत असतो. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक ओविकर मंडळे सहभागी होतात. येथील पुजारी म्हणून काशिलिंग तांबवे, शंकर तांबवे, ज्ञानू तांबवे हे काम पाहत आहेत.