इचलकरंजीत आज रोटरीचा साडी वॉकथॉन कार्यक्रम उत्साहात संपन्न ……

वस्त्रनगरी म्हणून जगभर ख्याती असलेल्या इचलकरंजी मध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात आणि या उपक्रमांना खूपच उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असतो. इचलकरंजीमध्ये रोटरी क्लब यांच्यामार्फत महिलांसाठी सतत काही ना काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जेणेकरून महिलांचा विकास होईल यासाठी अनेक कार्यक्रम, उपक्रम हे राबविले जातात आणि या रोटरी क्लबला महिलांचा प्रतिसाद देखील खूपच पाहायला आपल्याला मिळत असतोच.

तर आज रोटरी क्लबतर्फे असाच एक नवीन उपक्रम इचलकरंजी मध्ये पहिल्यांदा राबविण्यात आला. इचलकरंजी येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाइल सिटीच्या वतीने साडी वॉकथॉन हा नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. तर आज रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता साडी वॉकथॉन हा महिलांसाठी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात महिलांनी आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारे अनेक पारंपारिक अलंकार, नऊवारी साडी तसेच फेटा परिधान करून यात आपला सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात साड्यांचे विविध प्रकार पहायला मिळाले. म्हणजेच कोणी नऊवारी, कोणी मारवाडी, कासोटा साडी, तर कोणी पारंपारिक साडी नेसून महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद दर्शवला. एकूणच आजचा दिवस सर्व महिलांनी मिळून साडीचा उत्सव म्हणून साजरा केला.

माझी साडी माझा अभिमान हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. आजकालच्या या फॅशनच्या युगामध्ये जास्तीत जास्त महिलांचा कल हा वेस्टर्न कपडे घालण्याकडे आहे. तर आपली मराठी संस्कृती जपण्याचा हा यामागचा उद्देश होता. माझी साडी, माझा अभिमान हे पुन्हा एकदा इचलकरंजीच्या महिलांनी सिद्ध केले. रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र जैन, सचिव हेमंत दोशी, चेअरमन शैली जैन, को. चेअरमन केतकी साखरपे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.