अलीकडच्या काळात अपघाताच्या प्रमाणात भरमसाट वाढ झालेली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. असाच ह्रदय पिळवटून टाकणारा अपघात घडलेला आहे. या अपघातात माय लेकिंचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील माय – लेकींचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात पुणे-बंगळूर महामार्गावर येडेनिपाणी फाट्याजवळ सकाळी ६ वाजता झाला.
ही धडक एवढी जोराची होती की, रिक्षा रस्त्यावरुन १५ ते २० फूट खाली पडली. आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला औषधोपचारासाठी नागरमुळी (कर्नाटक) येथे नेत असताना हा दुर्देवी अपघात झाला. अक्काताई भुजंग येडके (वय ७० रा. नागाव ता. वाळवा), शारदा लक्ष्मण सुपणे (वय ५० रा. धणगर गल्ली, इस्लामपूर) अशी अपघातातील मृत माय – लेकींची नावे आहेत. रिक्षा चालक उत्तम सुपणे (रा. इस्लामपूर) हे जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, इस्लामपूर येथील शारदा सुपणे या आपल्या आईला अर्धांग वायूचा झटका आल्याने औषधोपचारासाठी घराजवळील रिक्षामधून ( क्र एम. एच. १० जी २३२७ ) नागरमुळी ( कर्नाटक ) येथे निघाल्या होत्या.
रिक्षा महामार्गावरुन कोल्हापूरकडे निघाली असता, येडेनिपाणी फाट्याजवळ अरुण पाटील धाब्यासमोर रिक्षाला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षा पुलावरून सेवा रस्तावर पडली. त्यामुळे रिक्षातील माय – लेकींचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे.
